तडसर येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याची स्थापना; १९ एप्रिलला लोकार्पण
कडेगांव: प्रतिनिधी
तडसर (ता. कडेगाव) येथे लोकवर्गणीतून उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या भव्य अश्वारूढ पुतळ्याची ग्रामस्थांच्या हस्ते मोठ्या उत्साहात स्थापना करण्यात आली. ढोल-ताशांच्या गजरात, वारकरी संप्रदायाच्या सहभागात व फटाक्यांच्या आतषबाजीतून काढण्यात आलेल्या भव्य मिरवणुकीनंतर पुतळ्याची स्थापना करण्यात आली. पारंपरिक शिवजयंतीच्या निमित्ताने येत्या १९ एप्रिल रोजी या पुतळ्याचे लोकार्पण करण्यात येणार आहे.
तडसर येथे शिवजयंतीच्या निमित्ताने गेल्या सुमारे ८० वर्षांपासून यात्रा भरविण्याची परंपरा आहे. गावातील नागरिकांच्या मागणीनुसार सन २०१९ मध्ये ग्रामसभेत छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य अश्वारूढ पुतळा उभारण्याचा ठराव करण्यात आला होता. त्यानंतर सर्व शासकीय परवानग्या घेऊन ग्रामस्थांनी एकत्र येत लोकवर्गणीतून सुमारे ६० लाख रुपयांचा निधी उभारण्याचा संकल्प केला आहे.
या निधीतून कोल्हापूर येथील शिल्पकार संजीव संपकाळ आणि अतुल डाके यांनी साकारलेला ११ फूट ३ इंच उंचीचा अश्वारूढ पुतळा तयार करण्यात आला. पुतळा गावात आणल्यानंतर ढोल-ताशा पथक, वारकरी संप्रदाय, शिवभक्तांच्या घोषणांचा गजर आणि फटाक्यांच्या आतषबाजीसह भव्य मिरवणूक काढण्यात आली.
या सोहळ्यात गावातील सर्व समाजातील महिला, ग्रामस्थ, तरुण तसेच तमाम शिवभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते. शिवरायांचा हा भव्य पुतळा गावाच्या वैभवात भर घालणारा ठरणार असल्याची भावना यावेळी ग्रामस्थांनी व्यक्त केली.