उद्या पलुसमध्ये’छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर:प्रांताधिकारी रणजीत भोसले
कडेगाव : प्रतिनिधी
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त शुक्रवार, दि. २४ जुलै रोजी पलुस येथील विश्वनाथ मल्टीपर्पज हॉलमध्ये’छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर’ आयोजित करण्यात आले आहे शिबिराच्या अध्यक्ष स्थानी आ. डॉ. विश्वजित कदम आहेत या शिबिराच्या माध्यमातून पलुस व कडेगाव तालुक्यातील नागरिकांना शासनाच्या विविध लोककल्याणकारी योजनांचा लाभ एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची माहिती प्रांताधिकारी रणजीत भोसले यांनी दिली.
या शिबिरात पलुस, कडेगाव तालुक्यातील प. स. सभापती, सर्व जि. प.,प. स. सदस्य, नगराध्यक्ष, नगरसेवक, सर्व गावचे सरपंच, चेअरमन सदस्य उपस्थित राहणार आहेत.
प्रांताधिकारी रणजीत भोसले यांनी सांगितले की, महाराजस्व शिबिरात विविध शासकीय योजनांची सविस्तर माहिती, आवश्यक कागदपत्रांची पडताळणी, अर्ज स्वीकारणे, लाभार्थ्यांना मार्गदर्शन तसेच शक्य तितक्या अर्जांचा जागेवरच निपटारा करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. त्यामुळे नागरिकांना विविध शासकीय कार्यालयांच्या वारंवार फेऱ्या मारण्याची गरज भासणार नाही.
या शिबिरात महसूल, कृषी, ग्रामविकास, पंचायत राज, समाजकल्याण, महिला व बालविकास, आरोग्य, अन्न व नागरी पुरवठा, सामाजिक न्याय, दिव्यांग कल्याण, शिक्षण, रोजगार आदी विविध शासकीय विभागांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित राहून नागरिकांना आवश्यक सेवा व मार्गदर्शन देणार आहेत. शिबिरामध्ये महिला शेतकरी प्रमाणपत्र वाटप, गावठाणातील नागरिकांना स्वामित्व सनद, मुख्यमंत्री बळीराजा शेत/पाणंद रस्ते योजना, शासकीय जमिनीवरील निवासी अतिक्रमणे नियमित करणे, ‘जिवंत सातबारा’ मोहीम, घरकुल योजनांचा लाभ, कौटुंबिक वाटणीपत्रावरील नोंदणी शुल्क माफीसह विविध महसुली सेवा आणि शासनाच्या योजनांचा लाभ नागरिकांना देण्यात येणार आहे
शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेऊ इच्छिणाऱ्या नागरिकांनी आवश्यक कागदपत्रांसह शिबिरात उपस्थित राहावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे. तसेच पलुस व कडेगाव तालुक्यातील नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन या महाराजस्व शिबिराचा लाभ घ्यावा आणि उपक्रम यशस्वी करावा, असेही आवाहन करण्यात आले आहे.
एकाच ठिकाणी विविध शासकीय सेवा उपलब्ध होणार असल्याने या महाराजस्व शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळण्याची अपेक्षा प्रशासनाने व्यक्त केली आहे