लाभक्षेत्रापासून वंचित भागाला मिळणार टेंभूचे पाणी
संग्रामसिंह देशमुख यांची ओगलेवाडी येथे अधिकाऱ्यांशी चर्चा
कडेपूर : प्रतिनिधी (परवेझ तांबोळी)
कडेगाव तालुक्यातील टेंभू उपसा सिंचन योजनेच्या पाण्यापासून अद्याप वंचित राहिलेल्या भागांना शाश्वतपणे पाणी उपलब्ध करून देण्यासाठी भाजपाचे पलूस-कडेगाव विधानसभा प्रमुख तथा सांगली जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संग्रामसिंह (भाऊ) देशमुख यांनी ओगलेवाडी येथे टेंभू उपसा जलसिंचन योजनेचे कार्यकारी अभियंता राजन डवरी यांची भेट घेऊन सविस्तर चर्चा केली.
या वेळी कडेगाव तालुक्यातील विविध गावांतील शेतकरी व ग्रामस्थ उपस्थित होते. टेंभू योजनेच्या लाभक्षेत्राबाहेर राहिलेल्या भागांचा सर्वे करून त्या भागांना शाश्वतपणे पाणी देण्यासाठी तात्काळ प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात येईल आणि मंजुरी मिळताच पाणीपुरवठ्याची कार्यवाही करण्यात येईल, असे आश्वासन कार्यकारी अभियंता राजन डवरी यांनी दिले.
या चर्चेदरम्यान कडेपूर, उपाळे-वांगी, उपाळे-मायणी, वांगरेठरे, शाळगाव, रायगाव, आमरापूर, हणमंतवडिये, येडे, तोंडोली, सासपडे, तडसर, हिंगणगाव खुर्द, अपशिंगे, कोतवडे, शिवाजीनगर, नेर्ली, वडियेरायबाग, नेवरी, येतगाव, खराडे-वांगी, खे.वांगी, कान्हरवाडी आदी गावांतील वंचित क्षेत्रांना टेंभू प्रकल्पाच्या पाण्याचा लाभ मिळावा यासाठी विविध कालवे, बंदिस्त पाइपलाईन, तलाव दुरुस्ती, पूल बांधकाम व इतर कामांचा प्रस्ताव मांडण्यात आला. या कामांमुळे मोठ्या प्रमाणावर शेती क्षेत्र ओलिताखाली येऊन शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे.
या संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याशीही चर्चा झाल्याचे सांगत, लवकरच कडेगाव तालुका दुष्काळमुक्त करण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना राबविल्या जातील, अशी माहिती संग्रामसिंह देशमुख यांनी दिली.
या वेळी टेंभू उपसा सिंचन प्रकल्प व्यवस्थापन विभागाचे अधिकारी तसेच कडेगाव तालुक्यातील शेतकरी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
दिवंगत लोकनेते आमदार संपतराव देशमुख यांनी कॅबिनेट मंत्रीपदाचा त्याग करून दुष्काळी भागासाठी टेंभू योजनेचे पाणी मिळवून दिले. त्यांच्या पावलावर पाऊल ठेवत संग्रामभाऊ देशमुख कडेगाव तालुक्यातील इंच न् इंच जमीन टेंभूच्या पाण्याखाली आणण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील आहेत. लवकरच स्व. आण्णांचे स्वप्न साकार होईल, असा विश्वास स्थानिक ग्रामस्थांनी व्यक्त केला.
— विलास (तात्या) गरुड, अॅड. सत्यजित यादव-देश
मुख, कडेपूर