दुबार मतदारांवर कठोर कारवाईची मागणी; कुचराई करणाऱ्या बीएलओंनाही जबाबदार धरा : पृथ्वीराज देशमुख
पलूस-कडेगाव मतदारसंघातील सुमारे २६ हजार दुबार नोंदींचा मुद्दा; भाजपचे प्रशासनाला निवेदन
कडेगाव, प्रतिनिधी : पलूस-कडेगाव विधानसभा मतदारसंघातील सुमारे २६ हजार दुबार मतदार नोंदींचा मुद्दा गंभीर स्वरूपाचा असून, मतदार यादी शुद्ध, पारदर्शक व त्रुटीमुक्त ठेवण्यासाठी दुबार नावे तातडीने वगळावीत. तसेच जाणीवपूर्वक दोन ठिकाणी मतदार नोंदणी करणाऱ्या मतदारांवर आणि कामात हलगर्जीपणा करणाऱ्या संबंधित अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी भारतीय जनता पक्षाच्या वतीने माजी आमदार पृथ्वीराज (बाबा) देशमुख यांनी केली आहे.
यासंदर्भात भारतीय जनता पक्षाच्या शिष्टमंडळाने उपविभागीय अधिकारी तथा सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी, कडेगाव यांना निवेदन सादर केले. मतदार यादी पुनरावलोकन प्रक्रियेदरम्यान काही गंभीर त्रुटी निदर्शनास आल्याचा उल्लेख या निवेदनात करण्यात आला आहे.
निवेदनात म्हटले आहे की, निवडणूक आयोगाच्या नियमांनुसार एखाद्या मतदाराचे नाव दोन वेगवेगळ्या विधानसभा मतदारसंघांमध्ये असल्यास संबंधित मतदाराने परगावी असलेले नाव वगळल्याचा अधिकृत पुरावा सादर करणे आवश्यक आहे. मात्र काही ठिकाणी संबंधित बीएलओ केवळ नमुना क्रमांक २ भरून तो ऑनलाइन अपलोड करत असून, आवश्यक पडताळणी आणि कागदपत्रांची छाननी केली जात नसल्याचे निदर्शनास आले आहे.
याबाबत बोलताना पृथ्वीराज देशमुख म्हणाले की, बहुतांश बीएलओ प्रामाणिकपणे आणि जबाबदारीने काम करत आहेत. मात्र काही ठिकाणी कामात कुचराई होत असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. काही प्रकरणांमध्ये बीएलओच्या मोबाईल अनुप्रयोगाच्या वापराबाबतही शंका उपस्थित करण्यात आली असून, या सर्व बाबींची सखोल चौकशी करून दोषी आढळणाऱ्यांवर कठोर प्रशासकीय कारवाई करण्यात यावी.
देशमुख यांनी पुढे सांगितले की, काही मतदारांनी दोन विधानसभा मतदारसंघांमध्ये नोंदणी करून दोन्ही ठिकाणी गणना प्रपत्र भरल्याचे पुरावे उपलब्ध झाले आहेत. त्यामुळे अशा प्रकरणांची तातडीने चौकशी करून संबंधितांवर निवडणूक आयोगाच्या नियमांनुसार योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात यावी.
मतदार यादीतील दुबार नोंदी या निवडणूक प्रक्रियेच्या विश्वासार्हतेवर परिणाम करणाऱ्या असल्याने त्यांचे उच्चाटन करणे अत्यावश्यक आहे. लोकशाही व्यवस्थेची पवित्रता अबाधित ठेवण्यासाठी मतदार नोंदणी प्रक्रियेत कोणत्याही प्रकारची निष्काळजीपणा किंवा गैरव्यवहार सहन केला जाऊ नये, असेही त्यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, भारत निवडणूक आयोगाने विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमाची मुदत १७ ऑगस्ट २०२६ पर्यंत वाढविली आहे. या वाढीव कालावधीत पलूस-कडेगाव मतदारसंघातील सर्व दुबार नोंदींची काटेकोर तपासणी करून त्या वगळण्यात याव्यात. तसेच संपूर्ण प्रक्रियेत पारदर्शकता राखून मतदार यादी त्रुटीमुक्त करण्यासाठी प्रशासनाने तातडीने ठोस पावले उचलावीत, अशी अपेक्षा पृथ्वीराज देशमुख यांनी व्यक्त केली.