ट्रिगर 1 व 2 मध्ये सांगली जिल्ह्यातील सर्व तालुक्यांचा समावेश
महसुलात सूट, पीक कर्ज पुनर्गठनासह 12 सवलती व उपाययोजना
सांगली, दि. 14 (जि. मा. का.) : खरीप २०२६ च्या हंगामातील परिस्थितीच्या आधारे राज्यातील ३०५ तालुक्यांमध्ये दुष्काळी परिस्थिती असल्याचे Trigger-1 (प्रथम कळ) व Trigger-2 (दुसरी कळ) यावरून दिसून येत असल्याने राज्यात आता एकूण अंतिमतः ३०५ दुष्काळी तालुके घोषित करण्यात आले आहेत. यामध्ये सांगली जिल्ह्यातील ट्रिगर 1 मध्ये समाविष्ट तालुक्यांसह सर्व तालुक्यांचा समावेश करण्यात आला आहे.
यापूर्वी दि. 25 सप्टेंबरच्या शासन निर्णयान्वये मिरज, कवठेमहांकाळ, आटपाडी आणि जत तालुक्यांत प्रथम कळ लागू असल्याने चारही तालुक्यांचा समावेश ट्रिगर 1 मध्ये करण्यात आला होता. दि. 14 ऑक्टोबरच्या शासन निर्णयान्वये यामध्ये उर्वरित सर्व शिराळा, वाळवा, खानापूर, तासगाव, कडेगाव आणि पलूस या तालुक्यांचा समावेश करण्यात आला आहे.
राज्यातील तालुक्यांमध्ये जून ते आजपर्यंत (दि. ५ ऑक्टोबर, २०२६ नंतर पावसाळा संपलेला आहे.) या कालावधीतील पर्जन्याची तूट व अन्य घटकांनी प्रभावित झालेल्या तालुक्यातील Trigger-1 (प्रथम कळ) आणि Trigger-2 (दुसरी कळ) बाबत प्राप्त झालेल्या माहितीनुसार अंतिमतः ३०५ तालुके हे दुष्काळी तालुके म्हणून जाहीर करण्यात आल्याचा मदत व पुनर्वसन विभागाचा शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे. यामध्ये खरीप हंगाम 2026 प्रथम कळ (ट्रिगर 1) आणि दुसरी कळ (ट्रिगर 2) लागू झालेल्या तालुक्यांमध्ये सांगली जिल्ह्यातील मिरज, कवठेमहांकाळ, आटपाडी, जत, शिराळा, वाळवा, खानापूर, तासगाव, कडेगाव आणि पलूस या तालुक्यांचा समावेश करण्यात आला आहे.
सदर अंतिमतः जाहीर झालेल्या ३०५ दुष्काळी तालुक्यांमध्ये पंचनामे करण्याची कार्यवाही जिल्हाधिकारी यांनी तात्काळ सुरू करावी. सर्वेक्षण केलेल्या क्षेत्रातील पिकांची स्थिती दर्शविणारे छायाचित्र व जीपीएस कोऑर्डिनेट संकलन करून पिक परिस्थितीचा अहवाल आयुक्त, कृषी यांच्या मार्फत शासनास तात्काळ सादर करण्यात यावा, असे या शासन निर्णयात म्हटले आहे.
या सवलती लागू
सांगली जिल्ह्यातील सर्व तालुक्यांसह राज्यातील 305 दुष्काळग्रस्त तालुक्यांमध्ये राज्य शासनाकडून विशेष बाब म्हणून पुढील उपाययोजना व सवलती लागू करण्यात आल्या आहेत. यामध्ये जमीन महसुलात सूट, पीक कर्जाचे पुनर्गठन, शेतीशी निगडित कर्जाच्या वसुलीस स्थगिती, कृषी पंपाच्या चालू वीजबिलात सूट, शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्कात माफी, रोहयोअंतर्गत कामांच्या निकषात शिथिलता आणून अधिकाधिक कामे सुरू करणे, आवश्यकतेनुसार पिण्याचे पाणी पुरवण्यासाठी टँकरचा वापर, टंचाई जाहीर केलेल्या गावांमध्ये शेतकऱ्यांच्या कृषी पंपाची वीज जोडणी खंडित न करणे, शेतीवर अवलंबून शेतकरी व मजुरांना अन्नधान्याची टंचाई भासू नये यासाठी व्यवस्था, जनावरांसाठी आवश्यक चारा उपलब्ध करून देणे, जलसंधारणाची कामे सुरू करणे, पिण्याचे पाणी व जनावरांच्या पाण्याचे नियोजन करणे या 12 उपाययोजना करण्यात येणार आहेत.
00000