सर्वसामान्य जनतेच्या मनासारखा राजा… राजासारखे मन…
स्व. अण्णांच्या विचारांचा खरा वारसदार – संग्रामसिंह देशमुख
स्व. संपतराव अण्णा देशमुख यांच्या कार्याची आठवण झाली की आजही असंख्य शेतकऱ्यांच्या डोळ्यांत कृतज्ञतेचे अश्रू दाटून येतात. ज्यांनी आयुष्यभर सामान्य माणसासाठी झटत वाळवंटात हिरवळ फुलवली, अशा त्या लोकनेत्याच्या स्मृती आजही जनमानसात जिवंत आहेत. आणि म्हणूनच जेव्हा संग्रामसिंह देशमुख लोकांमध्ये वावरताना दिसतात, तेव्हा अनेकांना अण्णांचाच आभास होतो.
परवा १६ मे रोजी स्व. अण्णांना आदरांजली वाहण्यासाठी त्यांच्या स्मारकस्थळी जाण्याचा योग आला. फक्त पुष्पहार अर्पण करून परतायचे असा साधा विचार होता; पण तिथले वातावरण, अण्णांच्या अस्तित्वाच्या खुणा आणि समोरून शांतपणे वाहणारे टेंभूचे पाणी पाहताना मन भावनांनी भरून आले. ज्याठिकाणी कधी कुसळही उगवत नव्हते, त्या माळरानावर आज शेतकरी लाखोंचे उत्पन्न घेत आहेत. ही किमया घडवणारा तो किमयागार आज आपल्यात नाही, ही भावना मनाला अस्वस्थ करून गेली.
अशा वेळी नजरेसमोर उभे राहिले ते संग्रामभाऊ देशमुख. अण्णांच्या शिलेदारांची आस्थेने विचारपूस करणारे संग्रामभाऊ पाहताना पुन्हा अण्णांचीच आठवण झाली. “तब्येत बरी आहे का? जेवण केले का?” असा साधा प्रश्न विचारताना त्यांच्या बोलण्यातला जिव्हाळा जाणवला आणि क्षणभर स्व. अण्णांचाच स्पर्श झाल्याचा भास झाला. तेव्हा जाणवले — अण्णा गेले नाहीत; ते संग्रामभाऊंच्या रूपाने आजही जनतेसोबत उभे आहेत.
राजकारणात वारसा फक्त नावाचा नसतो; विचारांचा, कृतीचा आणि जनसेवेच्या वृत्तीचाही असतो. स्व. अण्णांनी कधी पद, सत्ता किंवा पैशासाठी राजकारण केले नाही. त्यांनी शेतकऱ्यांसाठी कॅबिनेट मंत्रिपदालाही ठोकर दिली आणि “माझ्या शेतकऱ्यांना पाणी द्या” अशी भूमिका घेतली. आजच्या स्वार्थी राजकारणात हे उदाहरण पर्वतासारखे उंच वाटते. संग्रामभाऊंनीही त्याच विचारांचा वारसा जपला आहे. ज्या ठिकाणी अण्णांनी टेंभूची कुदळ मारली, त्याच भूमीवर त्यांचे स्मारक उभारून त्यांनी केवळ पितृऋण फेडले नाही, तर विचारांची परंपराही जिवंत ठेवली.
जिल्हा परिषदेचे अध्यक्ष म्हणून त्यांचा कारभार जनतेने जवळून अनुभवला आहे. पद मोठे झाले तरी माणुसकी हरवू न देणे, कार्यकर्त्यांशी आपुलकीने वागणे, विरोधकांबद्दल आकस न ठेवणे आणि सर्वसामान्यांशी मोठ्या भावासारखे नाते जपणे — ही त्यांची खरी ताकद आहे. आज अनेक तरुण नेते सुरक्षा रक्षकांच्या गराड्यात आणि दिखाव्याच्या राजकारणात अडकलेले दिसतात; पण संग्रामभाऊ लोकांमध्ये मिसळतात, त्यांच्या सुखदुःखात सहभागी होतात. म्हणूनच लोकांच्या मनात प्रश्न निर्माण होतो — “संग्रामभाऊच का?” आणि त्याचे उत्तरही त्यांच्या वागण्यातच मिळते.
स्व. अण्णांनी लोकांना फक्त पाणी दिले नाही; तर स्वतःच्या पायावर उभे राहण्याची ताकद दिली. जाती-धर्माच्या पलीकडे जाऊन शेतकऱ्यांच्या आयुष्यात नंदनवन फुलवले. त्या ऋणातून समाज आजही मुक्त झालेला नाही. त्यामुळेच संग्रामसिंह देशमुख यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणे, हीच अण्णांप्रती खरी कृतज्ञता ठरेल.
आज राजकारणात मतदारांना विकाऊ समजण्याची प्रवृत्ती वाढत असताना, “संग्राम देशमुख” ही हाक ऐकून धावून येणारा आणि सतत लोकांमध्ये राहणारा नेता समाजासाठी आशेचा किरण आहे. नेवरी वितरिकेसाठी त्यांनी दाखवलेली जिद्द आणि चिकाटी ही अण्णांच्या तडफेचीच आठवण करून देते.
स्व. अण्णांनी वाळवंटात हिरवे स्वप्न पेरले…
संग्रामभाऊ ते स्वप्न पुढे नेण्याचे काम करत आहेत…
म्हणूनच आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देताना एकच भावना मनात दाटून येते —
“सर्वसामान्य जनतेच्या मनासारखा राजा… आणि राजासारखे मन लाभलेला नेता म्हणजे संग्रामसिंह देशमुख!”
शब्दांकन: परवेज तांबोळी