जमीन आमची, निर्णय आमचा”च्या घोषणांनी परिसर दणाणला
नेवरीतून शक्तीपीठ महामार्गाविरोधात आत्मक्लेश पायी पदयात्रेला उत्स्फूर्त प्रारंभ
कडेगाव : प्रतिनिधी
नियोजित शक्तीपीठ महामार्गाविरोधात पलूस-कडेगाव शक्तीपीठ विरोध संघर्ष समितीच्या वतीने आज नेवरी येथून काढण्यात आलेल्या ‘आत्मक्लेश पायी पदयात्रे’ला शेतकरी, महिला व ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. “जमीन आमची, निर्णय आमचा”, “शेती वाचवा, गाव वाचवा” अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला होता.
पदयात्रेची सुरुवात महिलांच्या हस्ते श्रीफळ अर्पण करून करण्यात आली. यावेळी पारंपरिक पद्धतीने आंदोलनाला सुरुवात करत शेतकऱ्यांनी आपल्या भावना तीव्र शब्दांत व्यक्त केल्या. अनेक शेतकरी बैलगाड्या, बैलजोड्या तसेच शेळ्या-मेंढ्यांसह आंदोलनात सहभागी झाले होते. महामार्गामुळे शेतीसह पशुधनाचेही मोठे नुकसान होणार असल्याची भीती व्यक्त करत “जमिनी गेल्या तर जनावरे कुठे सांभाळायची?” असा सवाल आंदोलनकर्त्यांनी उपस्थित केला.
या पदयात्रेत दिपक लाड, श्रीदास होनमाने, बाबासाहेब मुळीक यांच्यासह हजारो शेतकरी सहभागी झाले आहेत. नेवरी, आंबेगाव, भाळवणी, शिरगाव, देवराष्ट्रे, कुंभारगाव मार्गे ही पदयात्रा घोगाव येथे पोहोचणार असून तेथे सायंकाळी जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले आहे. सभेत पुढील आंदोलनाची दिशा जाहीर होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
आंदोलनकर्त्यांनी शक्तीपीठ महामार्गामुळे सुपीक शेती, घरे, जनावरांचे निवासस्थान तसेच ग्रामीण जीवन उद्ध्वस्त होण्याची भीती व्यक्त केली. अनेक गावांतील शेतकरी या पदयात्रेत सहभागी झाल्याने आंदोलनाला व्यापक स्वरूप प्राप्त झाले आहे.
संघर्ष समितीच्या पदाधिकाऱ्यांनी सरकारवर टीका करताना सांगितले की, स्थानिक शेतकऱ्यांच्या भावना आणि मतांची दखल न घेता हा महामार्ग लादण्याचा प्रयत्न केला जात आहे. शेतकऱ्यांच्या जमिनी वाचवण्यासाठी आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशाराही त्यांनी दिला.
“सरकारने शक्तीपीठ महामार्गाचा निर्णय तात्काळ मागे घ्यावा, अन्यथा आगामी काळात तीव्र जनआंदोलन उभारले जाईल,” असा इशारा संघर्ष समितीच्या वतीने देण्यात आला आहे.