” आज भारताकडे कोणत्याच देशाची तिरक्या नजरेने बघण्याची हिम्मत नाही : संग्रामसिंह देशमुख ”
” कडेपूर येथे भाजपाचे पंडित दीनदयाल उपाध्याय प्रशिक्षण महाअभियान संपन्न ”
कडेगाव : प्रतिनिधी.
राष्ट्रप्रथम या तत्त्वावर भाजपाने पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली राष्ट्रहिताचे निर्णय घेतले सर्जिकल स्ट्राइक, ऑपरेशन सिंदूर सारख्या कारवाई केल्याने आज संपूर्ण जगात भारताकडे तिरक्या नजरेने बघण्याची कोणाची हिंमत होत नाही. आज इराण इसराइल युद्धजन्य परिस्थितीच्या झळा संपूर्ण जगाला बसत असल्या तरी भारतात कुठे ही इंधन टंचाई नसून सर्व सुरळीत सुरू आहे तरी देखील विरोधक फक्त जनतेची दिशाभूल करण्यात व्यस्त आहेत, या आधीच्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत ८ पैकी ७ जागांवर भाजपाने विजय मिळवला होता या निवडणुकीत झालेल्या पराभवाचे चिंतन करून कार्यकर्त्यांनी पुन्हा तळागाळापर्यंत सर्वसामान्य जनतेची कामे करून ताकतीने कामाला सुरुवात करण्याचे आव्हान भाजपाचे पलूस कडेगाव विधानसभाप्रमुख संग्रामसिंह देशमुख यांनी केले.
ते कडेपूर ता.कडेगाव येथील पृथ्वीसंग्राम संस्थेच्या अनुशीला सभागृहामध्ये भाजपाच्या पंडित दीनदयाल उपाध्याय प्रशिक्षण महाअभियानामध्ये मार्गदर्शन करताना बोलत होते.
यावेळी आमदार सत्यजित देशमुख, क्रांती कारखान्याचे चेअरमन शरद लाड, भाजपा किसान मोर्चा सांगली जिल्हाध्यक्ष अँड विशाल मोहिते, कार्यकारणी सदस्य राजाराम गरुड, कडेगावचे नगराध्यक्ष धनंजय देशमुख, उपनगराध्यक्ष अमोल डांगे,कडेगांव पंचायत समिती सदस्या पूनम माळी, भाजपा कडेगाव तालुकाध्यक्ष विकास सूर्यवंशी, शहराध्यक्ष संदीप गायकवाड प्रमुख उपस्थित होत्या.
या पंडित दीनदयाल उपाध्याय प्रशिक्षण महाअभियानामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मन की बातचे लाईव्ह प्रक्षेपण पाहण्यात आले, विविध विषयांवर मान्यवरांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले, महाअभियानाची सांगता सामूहिक ‘वंदे मातरम’ राष्ट्रीयगीताने करण्यात आली.
यावेळी पलूस कडेगाव विधानसभा मतदारसंघातील सर्व आजी माजी नगरसेवक, जिल्हा परिषद, पंचायत समिती सदस्य यांच्यासह सर्व शक्ती केंद्रप्रमुख, बूथ प्रमुख महिलाकार्यकर्ता पदाधिकारी उपस्थित होते.