एकाच छताखाली विविध योजनांचा लाभ; पलुसमध्ये ‘छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिर’ उत्साहात
कडेगाव : प्रतिनिधी
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा वाढदिवस व मा. उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांच्या जयंती निमित्त
महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभागातर्फे नागरिकांना विविध महसुली सेवा, शासकीय योजनांचा लाभ आणि प्रलंबित महसुली प्रकरणांचा तातडीने निपटारा करण्यासाठी आयोजित ‘छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिर’ पलुस येथे उत्साहात पार पडले. तालुक्यातील 24 हजार 444 नागरिकांनी विविध योजनांचा लाभ घेतला.
शिबिराच्या अध्यक्षस्थानी आमदार डॉ. विश्वजित कदम होते. यावेळी माजी आमदार पृथ्वीराज देशमुख, जिल्हा परिषद उपाध्यक्ष रुषिकेश लाड, महेंद्र लाड, प्रांताधिकारी रणजीत भोसले,कडेगावचे तहसीलदार अजित शेलार तसेच पलुसच्या तहसीलदार दिप्ती रीठे-जाधव यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी, कर्मचारी, लोकप्रतिनिधी आणि मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.
शिबिरात महसूल, कृषी, पंचायत समिती, समाजकल्याण, शिक्षण, परिवहन आदी विविध विभागांच्या माध्यमातून नागरिकांना सेवा देण्यात आल्या. विविध दाखले व प्रमाणपत्रांचे वितरण, कृषी योजनांची माहिती, दिव्यांगांसाठी कल्याणकारी योजनांचा लाभ, महिला बचत गटांना मार्गदर्शन, एसटी सवलत पास वितरण तसेच प्रलंबित महसुली प्रकरणांचा जागेवरच निपटारा करण्यात आला.
आवश्यक कागदपत्रांसह आलेल्या लाभार्थ्यांच्या अर्जांवर तातडीने कार्यवाही करण्यात आली. त्यामुळे नागरिकांना विविध कार्यालयांच्या फेऱ्या माराव्या लागल्या नाहीत.
एकाच छताखाली अनेक शासकीय योजनांचा लाभ मिळाल्याने नागरिकांचा वेळ व खर्च वाचला. शासनाच्या या उपक्रमाबद्दल लाभार्थ्यांनी समाधान व्यक्त केले