तडसरचे सुपुत्र ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ. जयसिंगराव पवार यांचे निधन
कडेगांव: संपादकीय
तडसर (ता. कडेगाव) : तडसर गावचे सुपुत्र व ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ. जयसिंगराव पवार यांचे आज (पहाटे) कोल्हापूर येथे निधन झाले. त्यांच्या निधनामुळे इतिहास संशोधन क्षेत्रात तसेच कोल्हापूर ,सांगली जिल्ह्यात शोककळा पसरली आहे.
मराठा साम्राज्याच्या इतिहासाचा सखोल अभ्यास करून ते अस्सल दस्तऐवजांच्या आधारे समाजासमोर मांडण्याचे मोठे कार्य त्यांनी केले. छत्रपती संभाजी महाराज, महाराणी येसूबाई, ताराराणी, राजाराम महाराज, संताजी-धनाजी, राजर्षी शाहू छत्रपती, रामचंद्रपंत अमात्य यांच्यापासून क्रांतिसिंह नाना पाटील यांच्यापर्यंत अनेक मराठी इतिहासपुरुषांवर त्यांनी संशोधनात्मक लेखन केले.
मराठा इतिहासातील अनेक गैरसमज व किटाळ दूर करून वस्तुनिष्ठ व दस्तऐवजाधारित इतिहास जनतेसमोर आणण्याचे त्यांचे कार्य विशेष महत्त्वाचे मानले जाते. इतिहास विषयावरील त्यांचे लेखन, व्याख्याने आणि संशोधनामुळे अनेक विद्यार्थ्यांना व अभ्यासकांना प्रेरणा मिळाली.
डॉ. जयसिंगराव पवार यांच्या निधनामुळे मराठी इतिहास संशोधन क्षेत्रातील एक अभ्यासू, प्रामाणिक व परखड व्यक्तिमत्त्व काळाच्या पडद्याआड गेले आहे.
भावपूर्ण श्रद्धांजली!
त्यांच्या पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन.