चिंचणी-वांगी पोलिसांची उत्कृष्ट कामगिरी; पोलीस अधीक्षकांकडून गौरव
कडेगाव : प्रतिनिधी
वांगी (ता. कडेगाव) हद्दीतील माळी मळा परिसरात घडलेल्या सोन्याच्या बोरमाळ चोरीच्या गुन्ह्याचा छडा लावून आरोपींना अटक करत चोरीचा मुद्देमाल हस्तगत केल्याबद्दल चिंचणी-वांगी पोलीस ठाण्याच्या पथकाचा पोलीस अधीक्षकांकडून गौरव करण्यात आला.
मिळालेल्या माहितीनुसार, वांगी येथील शालन ज्ञानू माळी (वय 75) या 14 फेब्रुवारी 2026 रोजी त्यांच्या घरासमोर बसल्या असताना एक अनोळखी पुरुष व एक महिला यांनी पाणी पिण्याचा बहाणा करून त्यांच्या गळ्यातील सोन्याची बोरमाळ चोरी करून नेली होती. याबाबत चिंचणी-वांगी पोलीस ठाण्यात गुन्हा र.नं. 10/2026 भारतीय न्याय संहिता कलम 304(2), 3(5) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.
या गुन्ह्याचा तात्काळ तपास करून आरोपींची ओळख पटविण्याच्या सूचना पोलीस अधीक्षक संदीप घुगे, अपर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर, तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी विपुल पाटील यांनी दिल्या होत्या. त्यानुसार चिंचणी-वांगी पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाने गोपनीय व तांत्रिक माहितीच्या आधारे तपास करत प्रमोद शंकर माळी (वय 35) व रेश्मा राजाराम साठे (वय 30) (सध्या रा. वांगी, ता. कडेगाव, मूळ रा. बामणी, ता. खानापूर, जि. सांगली) या दोघांना ताब्यात घेतले.
सखोल चौकशीत त्यांच्याकडून सदर गुन्ह्यातील सोन्याची बोरमाळ तसेच कडेगाव पोलीस ठाणे गु.र.नं. 29/2026 व विटा पोलीस ठाणे गु.र.नं. 08/2026 मधील चोरीस गेलेल्या मोटारसायकली असा एकूण 1 लाख 15 हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.
दरम्यान, या उत्कृष्ट कामगिरीबद्दल 25 मार्च 2026 रोजी सांगली येथे पोलीस अधीक्षक कार्यालयात झालेल्या क्राईम आढावा बैठकीत चिंचणी-वांगी पोलीस ठाण्याच्या पथकाचा सन्मान करण्यात आला.
यावेळी सहायक पोलीस निरीक्षक राहुल घुगे, पोलीस उपनिरीक्षक योगेश शेलार, पोलीस हवालदार विनायक सावळगे, संपतराव जाधव, पोलीस नाईक विक्रम कुंभार, पोलीस कॉन्स्टेबल संकेत सावंत व प्रविण मलमे यांना पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांच्या हस्ते प्रशस्तिपत्र देऊन गौरविण्यात आले. तसेच भविष्यातही अशाच प्रकारे उत्कृष्ट कर्तव्य बजावण्याच्या शुभेच्छा देण्यात आल्या.