कडेगाव : येथे स्मार्ट मीटरला विरोध व अन्य मागण्यांसाठी पाणी संघर्ष समितीतर्फे महावितरण कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला.
कडेगाव, ता. 25 : जबरदस्तीने स्मार्ट मीटर बसवणे बंद करा,शेतकऱ्यांना शेती पंपासाठी सौरऊर्जा योजनेची सक्ती बंद करुन तात्काळ नवीन वीज कनेक्शन द्यावे आदी मागण्यासाठी आज येथील महावितरणच्या उपविभागीय कार्यालयावर पाणी संघर्ष समितीतर्फे मोर्चा काढण्यात आला यावेळी मोर्चेकऱ्यांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले.
पाणी संघर्ष समितीचे अध्यक्ष डी.एस.देशमुख म्हणाले,शहरात जूने मीटर बदलून नवीन स्मार्ट मीटर महावितरण कडून जबरदस्तीने बसवण्यात येत आहे.याबाबत पाणी संघर्ष समिती व येथील नागरिकांच्यावतीने महावितरणचे उपकार्यकरी अधिकारी यांना भेटून विरोध दर्शवण्यात आला होता.तसेच जबरदस्तीने बसवण्यात आलेली स्मार्ट मीटर काढून त्या ठिकाणी पूर्वीची जुनी मीटर बसवण्याबाबत मागणी करण्यात आली होती.याबाबत महावितरणने कसलीही कार्यवाही केली नाही,तेव्हा याबाबत कार्यवाही करण्यात यावी.
तसेच तालुक्यात स्मार्ट मीटर बसवणे बंद करावे, तालुक्यातील शेतकऱ्यांना शेतीसाठी दिवसा वीज द्यावी,शेतकऱ्यांना कृषी पंपासाठी नवीन वीज कनेक्शन देणे सुरू करावे, सौरऊर्जेची योजना फसवी व कुचकामी असून त्यामुळे वीज ग्राहकांना आर्थिक भुर्दंड व नाहक त्रास सहन करावा लागत आहे.
बाळकृष्ण यादव म्हणाले,शासन हे सर्वसामान्य व शेतकरी विरोधी असून उद्योगपतीधार्जिणे आहे.तेव्हा महावितरणने जबरदस्तीने स्मार्ट मीटर बसवू नये.स्मार्ट मीटर बसवलेल्या ग्राहकांना मोठ्या प्रमाणात वीज बिल आकारणी होत असून ते सर्व सामान्यांना न परवडणारे आहे.
यावेळी वंचितचे जीवन करकटे,अनिल जरग,संजय देशमुखे आदींनी भाषणे करुन महावितरणच्या अधिकाऱ्यांना धारेवर धरले.
यावेळी पाणी संघर्ष समितीचे अध्यक्ष डी.एस. देशमुख,महावितरणचे उपकार्यकरी अभियंता किरण डोईफोडे,भाऊसाहेब यादव,बजरंग अडसूळ,अभिमन्यू वरुडे,संदीप देसाई,बाळासाहेब वत्रे,स्वाभिमानीचे इम्रान पटेल,संभाजी यादव यांचेसह,शेतकरी,वीज ग्राहक यांचेसह पाणी संघर्ष समितीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शासनाच्या धोरणानुसार जुने मीटर काढून स्मार्ट मीटर बसवले जात आहे.ते अचूक व ग्राहकांच्या फायद्याचे आहे.हे मीटर बसवल्याने ग्राहकांना सबसिडी मिळत आहे.याच्या माध्यमातून आपण वीज वापरावर नियंत्रण ठेवू शकतो.त्यामुळे कोणीही गैरसमज करून घेऊ नये,तसेच विनाकारण विरोधही करु नये.आतापर्यंत तालुक्यात 8 हजार 500 स्मार्ट मीटर बसवण्यात आली आहेत.
-किरण डोईफोडे,उपकार्यकरी अभियंता कडेगाव