समृद्ध अभियानाच्या आढावा बैठकीतच कृतीचा धडाका”
डॉ. जितेश कदम यांनी प्रशासनाला दिली नवी दिशा : कडेगाव पंचायत समितीत पहिल्याच बैठकीत कार्यक्षमतेची छाप
कडेगाव : प्रतिनिधी
मुख्यमंत्री समृद्ध ग्राम अभियानाच्या पार्श्वभूमीवर कडेगाव पंचायत समितीत आयोजित करण्यात आलेली आढावा बैठक ही केवळ औपचारिक न ठरता प्रशासनातील त्रुटींवर थेट उपाययोजना करण्याची दिशा देणारी ठरली. पंचायत समितीचे सभापती डॉ. जितेश कदम यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत तालुक्यातील विविध विकासकामांचा सविस्तर आढावा घेण्यात आला. बैठकीदरम्यान सरपंच, ग्रामसेवक, पदाधिकारी व विविध विभागांचे अधिकारी यांनी गावपातळीवरील समस्या व अडचणी मांडल्या.
या बैठकीस उपसभापती डॉ. विजय महाडिक, पंचायत समिती सदस्य पैलवान रणजित पवार, गटविकास अधिकारी प्रशांत राऊत, गटशिक्षणाधिकारी ज्ञानेश्वर चिमटे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते. समृद्ध ग्राम अभियान प्रभावीपणे राबवण्यासाठी गावपातळीवर येणाऱ्या अडचणींवर सखोल चर्चा करण्यात आली.
बैठकीदरम्यान प्रशासनातील दुर्लक्ष, तांत्रिक अडथळे आणि विभागांमधील समन्वयाचा अभाव ही प्रमुख समस्या असल्याचे स्पष्ट झाले. अनेक ग्रामपंचायतींमध्ये मागील पाच वर्षांपासून इंटरनेट सेवा बंद असून ‘महा-नेट’ सुविधा कार्यान्वित नसल्याची बाब समोर आली. तसेच मनरेगा अंतर्गत काही कामे अपूर्ण राहिल्यामुळे नवीन विकासकामांना मंजुरी मिळण्यात अडथळे येत असल्याचेही निदर्शनास आले. कुशल मजुरांच्या कामांची बिलं प्रलंबित असल्यामुळे अनेक कामे रखडली असल्याची तक्रारही सरपंचांनी मांडली.
याशिवाय काही अंगणवाड्यांवरील सोलर यंत्रणा बंद पडलेल्या आहेत. अंगणवाडीतील बालक व गरोदर मातांना दिला जाणारा आहार निकृष्ट दर्जाचा असल्याची तक्रार करण्यात आली. बेलवडे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात नियुक्त डॉक्टर नियमितपणे उपस्थित राहत नसल्याची गंभीर बाबही बैठकीत मांडण्यात आली.
या सर्व प्रश्नांची गांभीर्याने दखल घेत सभापती डॉ. जितेश कदम यांनी बैठकीदरम्यानच संबंधित जिल्हास्तरीय अधिकाऱ्यांशी दूरध्वनीवर संपर्क साधत तातडीने उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या. “गावांचा सर्वांगीण विकास आणि मुख्यमंत्री समृद्ध ग्राम अभियानात तालुक्याची चांगली कामगिरी” हे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून प्रशासनाला स्पष्ट मार्गदर्शन करण्यात आले. त्यांच्या तत्पर व समन्वयात्मक भूमिकेमुळे उपस्थित सरपंच व पदाधिकाऱ्यांमध्ये विश्वासाचे वातावरण निर्माण झाले.
डॉ. जितेश कदम यांनी प्रशासनातील अधिकाऱ्यांना कामकाजात पारदर्शकता आणि वेग राखण्याच्या सूचना देत विकासकामे वेळेत पूर्ण करण्यावर भर दिला. तसेच ग्रामपंचायतींना येणाऱ्या अडचणी तात्काळ सोडविण्यासाठी संबंधित विभागांनी समन्वय साधून काम करण्याचे निर्देश दिले.
क्षेत्रभेटींवर भर
सभापती डॉ. जितेश कदम यांनी सर्व पंचायत समिती सदस्यांना आपल्या गणातील जिल्हा परिषद शाळा, प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्र तसेच अंगणवाड्यांना प्रत्यक्ष भेट देऊन तेथील समस्या जाणून घेण्याच्या सूचना दिल्या. प्रत्यक्ष पाहणीद्वारे समस्या समजून घेतल्यास त्यावर योग्य उपाययोजना करता येतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
.