दिव्यांग लाभार्थ्यांनी यूडीआयडी कार्ड काढणे अनिवार्य : तहसीलदार अजित शेलार
कडेगाव : प्रतिनिधी
सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या विविध योजनांचा लाभ मिळविण्यासाठी दिव्यांग लाभार्थ्यांनी वैश्विक ओळखपत्र (यूडीआयडी कार्ड) काढणे अनिवार्य करण्यात आले आहे. त्यामुळे सर्व दिव्यांगांनी आपले यूडीआयडी कार्ड आधार कार्डशी संलग्न करून आवश्यक कागदपत्रे १५ मार्च २०२६ पूर्वी ग्राम महसूल अधिकारी किंवा महसूल सेवकांकडे जमा करावीत, असे आवाहन कडेगावचे तहसीलदार अजित शेलार यांनी केले आहे.
तहसीलदार शेलार म्हणाले की, दिव्यांगांसाठी असलेल्या विविध शासकीय योजना, सवलती व लाभ मिळविण्यासाठी सर्व दिव्यांगांना यूडीआयडी कार्ड अनिवार्य करण्यात आले आहे. त्यामुळे कडेगाव तालुक्यातील सर्व दिव्यांग लाभार्थ्यांनी आपले यूडीआयडी कार्ड आणि आधार कार्ड अद्ययावत करून २५ मार्च २०२६ पूर्वी संबंधित ग्राम महसूल अधिकारी किंवा महसूल सेवकांकडे जमा करावे.
सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या शासन निर्णयानुसार विशेष सहाय्य योजनांतील लाभार्थ्यांचे आधार कार्ड संबंधित योजनेशी तीन महिन्यांच्या आत संलग्न करणे बंधनकारक करण्यात आले आहे. तसेच १५ सप्टेंबर २०२५ च्या शासन निर्णयानुसार विशेष सहाय्य योजनेतील दिव्यांग लाभार्थ्यांना मिळणारे मासिक अर्थसहाय्य १,५०० रुपयांवरून २,५०० रुपये इतके करण्यात आले आहे. हे अर्थसहाय्य डीबीटी प्रणालीद्वारे थेट लाभार्थ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यात जमा केले जाते.
निर्धारित मुदतीत यूडीआयडी कार्ड व आधार कार्ड जमा न केल्यास पात्र लाभार्थ्यांचे अनुदान बंद होण्याची शक्यता नाकारता येत नाही, असेही प्रशासनाने स्पष्ट केले आहे. त्यामुळे संजय गांधी निराधार योजना व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती योजना यांचा लाभ घेणाऱ्या सर्व दिव्यांग लाभार्थ्यांनी ही प्रक्रिया तात्काळ पूर्ण करावी, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले
आहे.