मराठ्यांचा इतिहास जपणारं, शिवजागृतीचं गाव – तडसर
सदानंद माळी, प्रविण पवार (तडसर)
प्रतिनिधी
कडेगाव तालुक्यातील तडसर हे गाव केवळ भौगोलिक सौंदर्यामुळे नव्हे, तर आपल्या समृद्ध ऐतिहासिक, वैचारिक आणि सांस्कृतिक वारशामुळे संपूर्ण महाराष्ट्रात वेगळी ओळख निर्माण करत आहे. अर्धचंद्राकृती डोंगररांगांनी वेढलेले, दाट झाडीत लपलेले आणि ओढ्याच्या काठावर वसलेले हे गाव निसर्गरम्य असून, येथे डोंगराई देवीचे मंदिर जणू आकाशाच्या कपाळावर उठून दिसते.
या ऐतिहासिक गावात छत्रपती शिवाजी महाराज जयंती मोठ्या उत्साहात आणि वैचारिकतेने साजरी केली जाते. यंदा शिवजयंतीनिमित्त गावात शिवछत्रपतींच्या भव्य अश्वारूढ पुतळ्याचे अनावरण आणि ‘शिवतीर्थ’ लोकार्पण सोहळा पार पडणार असून, गावात अभिमानाचे वातावरण निर्माण झाले आहे.
शिवविचारांनी प्रेरित तडसर
तडसरची माती ही शिवविचारांनी प्रेरित आहे. जातीभेदाला थारा न देणारे, स्वावलंबनाचा मार्ग स्वीकारणारे आणि प्रत्येक नागरिकाला आपला घटक मानणारे हे गाव खऱ्या अर्थाने शिवरायांच्या शिकवणीचे पालन करणारे आहे. “तड” म्हणजे हट्ट आणि “सर” म्हणजे यश — असा मराठी बाणा जपणारे तडसर हे नावही या वृत्तीचे प्रतीक आहे.
शिवजयंती – सण नव्हे, विचारांची जागृती
तडसरमध्ये शिवजयंती हा केवळ उत्सव नसून तो इतिहास जागवण्याचा आणि मराठी अस्मिता जपण्याचा एक उपक्रम आहे. मिरवणुकांपुरता मर्यादित न राहता, हा उत्सव शिवाजी महाराजांच्या विचारांचा प्रसार आणि खरा इतिहास घरोघरी पोहोचवण्यासाठी साजरा केला जातो.
इतिहास संशोधनाचा दीपस्तंभ
या गावाचे सुपुत्र आणि ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ. जयसिंगराव पवार यांनी मराठा साम्राज्याचा खरा इतिहास समाजासमोर आणण्यात मोठे योगदान दिले. त्यांनी “छत्रपती राजाराम महाराज आणि मराठा राज्य” या विषयावर पीएचडी करून संशोधन क्षेत्रात महत्त्वपूर्ण काम केले. तसेच महाराणी ताराबाई यांच्या कार्यावर त्यांनी लिहिलेला ग्रंथ महाराष्ट्रातील पहिला चिकित्सक अभ्यास मानला जातो.
त्यांच्या कार्याची दखल घेत त्यांना यशवंतराव चव्हाण राज्यस्तरीय पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. २६ मार्च रोजी त्यांच्या निधनाने इतिहास क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाली.
शिक्षण आणि साहित्याचा मजबूत पाया
तडसर हे शिक्षणप्रेमी गाव म्हणूनही ओळखले जाते. १९४८ साली कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या रयत शिक्षण संस्थेला रामचंद्रराव पवार यांनी जमीनदान करून तालुक्यातील पहिले विद्यालय सुरू करण्यास मदत केली. आज या विद्यालयाने ७५ वर्षांचा टप्पा गाठला असून, येथून अनेक अधिकारी, संशोधक आणि साहित्यिक घडले आहेत.
गावात सध्या ७५ पेक्षा अधिक पीएचडी धारक असून, शिक्षणामुळे घडलेली ही माणसं तडसरच्या प्रगतीचे प्रतीक आहेत.
साहित्य, कला आणि संशोधनातही आघाडी
तडसरने साहित्य क्षेत्रातही मोठे योगदान दिले आहे. कथाकार वामन होवाळ, कवी पांडुरंग माळी, लेखक विजय माळी, अधिकराव गुरव, संजय परीट यांसारख्या साहित्यिकांनी गावाचे नाव उज्वल केले आहे. वामन होवाळ यांच्या “मजल्याच घर” या कथेचा समावेश बारावीच्या पाठ्यपुस्तकात करण्यात आला आहे.
तसेच डॉ. जोतीराम पवार यांनी शाहू महाराजांच्या इतिहासावर संशोधन करून कोल्हापूर येथे विशेष अभ्यास केंद्र सुरू केले आहे.
विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी
तडसरमधील अनेक व्यक्तींनी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केली आहे. अरविंद इनामदार (माजी पोलीस महासंचालक), कुस्तीपटू हरीनाना पवार, तसेच कृषी, पर्यावरण, कला आणि शिल्पकलेतही गावातील नागरिकांनी आपली छाप पाडली आहे.
सांस्कृतिक परंपरा आणि गौरव
२०१७ मध्ये तडसर येथे पहिले ग्रामीण मराठी साहित्य संमेलन आयोजित करण्यात आले होते. तसेच काव्यरत्न पुरस्कार आणि रा. तु. पाटील साहित्य पुरस्काराच्या माध्यमातून साहित्यिकांना प्रोत्साहन दिले जाते.
तडसर हे गाव खऱ्या अर्थाने “माणसं घडवणारे गाव” म्हणून ओळखले जाते. शिवविचार, शिक्षण, साहित्य आणि संस्कृती यांचा सुंदर संगम येथे दिसून येतो. शिवजयंती निमित्त होणारा अश्वारूढ पुतळ्याचा अनावरण सोहळा आणि ‘शिवतीर्थ’ लोकार्पण हा तडसरकरांसाठी अभिमानाचा आणि इतिहासाला उजाळा देणारा क्षण ठरणार आहे.